मुंबई : एसटीचे अधिकारी सक्षम आहेत. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली कामे प्रामाणिकपणे केली, तर एसटीची गती अधिक वाढेल, असे मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनी व्यक्त केले. तसेच एसटीच्या वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांना २.६७ टक्क्यांची वेतनवाढ देण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
एसटीच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई सेंट्रल येथील गोकूळदास तेजपाल सभागृहात शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी बोलताना रावते म्हणाले की, इंधनाचा खर्च वाढत असल्याने डिझेलला पर्याय म्हणून नैसर्गिक गॅसचा वापर केला जाणार आहे. परिवहन विभागाकडून पर्यावरण निधी म्हणून महामंडळाला २५० कोटी ते ३०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यात ३ हजार मार्गस्थ निवारे बांधण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. पंढरपूरला ३४ फलाटांचे अद्ययावत बस स्थानक उभारण्यात येत आहे, अशी माहिती रावते यांनी दिली.दरम्यान, रावते यांनी या वेळी स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ केला. त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्न मिटेल.
निलंबन आणि बदली प्रक्रिया हद्दपारसहा महिन्यांत एसटीतील निलंबन आणि बदली प्रक्रिया बंद करण्यात येईल. त्यामुळे तडकाफडकी निलंबन, विशिष्ट कालावधीसाठी होणारे निलंबन बंद होईल. चालक, वाहक एखाद्या प्रकरणात दोषी असेल, तर ३ ते ६ महिन्यांपुरते निलंबन केले जाईल. ६ महिन्यांच्या आत आरोपांची चौकशी पूर्ण केली जाईल. शिवाय कर्मचाऱ्यांनी ज्या विभागात अर्ज केला आहे, तेथेच त्यांची नियुक्ती होणार आहे.
१६३ अधिकाऱ्यांची खातेनिहाय बढतीअधिकाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करून त्यांना भरतीमध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. खातेनिहाय बढतीमध्ये १६३ जणांची निवड झाली आहे. महामंडळामध्ये वर्ग १ आणि २ मध्ये ५३० अधिकारी कार्यरत असून, त्यांना पाचव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर २.६७ टक्क्यांची वाढ मिळणार आहे.