मुंबई : दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक हजार गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.परब म्हणाले, दिवाळीच्या सुट्टीत प्रवासी महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळांना भेट देतात, तर अनेक जण आपापल्या गावी जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारांतून दररोज सुमारे एक हजार जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. गेल्या वर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी गर्दी पाहता गाड्यांचे योग्य नियोजन करा, सर्व बसेस सुस्थितीत ठेवा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे निर्देश मंत्री ॲड. परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज; राज्यभरातील आगारातून दररोज सोडणार एक हजार जादा गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 9:34 AM