महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील गावखेड्यात पोहोचलेली एसटी आता बायोडिझेलवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. एका खासगी बायोडिझेल कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंजुरी दिली आहे. राज्यभर एसटीचे जाळे पसरले गाव-खेड्यात बायोडिझेलच्या उपलब्धतेसाठी कंपनीकडून जागेचा शोध सुरू झाला आहे. टप्प्याटप्प्याने बायोडिझेलचा समावेश एसटीच्या सर्व बसमध्ये करण्यात येणार आहे.पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात दूषित होते. त्यामुळे ‘प्रदूषणमुक्त प्रवास’ ही संकल्पना रुजवण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढाकार घेतला आहे. जागतिक स्तरावर पेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधन म्हणून बायोडिझेलकडे पाहिले जात आहे. परिणामी राज्यात एसटी प्रशासनाने प्रस्तावाला मंजुरी देत प्रदूषणमुक्त प्रवासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.वनस्पती तेलापासून याची निर्मिती केल्यामुळे हे इंधन पूर्णपणे सुरक्षित आहे. सध्या उपलब्ध असलेल्या इंधनापेक्षा हे इंधन स्वस्त आहे. एसटीच्या गाड्यांमध्ये असलेल्या इंजीनमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्याची गरज नाही. शिवाय सध्या वापरात असलेल्या डिझेलसह बायोडिझेल एकत्र करून वापरल्यास गाडीच्या इंजीनमध्ये कोणताही बिघाड होणार नाही. एसटीची दररोजची मागणी खूप मोठी असल्याने ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे, असे बायोडिझेल पुरवणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात बायोडिझेलच्या उपलब्धतेसाठी कंपनीकडून जागेचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.
‘बायोडिझेल’वर धावण्यासाठी एसटी सज्ज
By admin | Published: June 27, 2017 2:08 AM