पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदांच्या भरती प्रक्रियेत तीन वर्ष अवजड वाहन चालविण्याच्या अटीमुळे अर्ज कमी आले आहेत. महिलांचा अत्यल्प प्रतिसाद मिळला आहे. त्यामुळे आता हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. तसेच पुरूष उमेदवारांना असलेली तीन वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करून एक वर्ष करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. सध्या सुरु असलेल्या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत. आतापर्यंत केवळ २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. यापार्श्वभुमीवर महिला उमेदवारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने शुक्रवारी काही महत्वपुर्ण निर्णय घेतले. आधीच्या निर्णयानुसार महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. ही अट आता रद्द करण्यात आली आहे. सुधारित निर्णयानुसार हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. भरती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या महिलांना महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे एक १ वर्षा प्रशिक्षण देण्यात येईल. या कालावधीत त्यांना विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना घ्यावा लागेल. त्यानंतर या महिला एसटी बस चालवू शकतील. त्याचप्रमाणे महिलांच्या शारीरीक उंचीची अटही शिथील करुन ती आता किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी इतकी कमी करण्यात आली आहे. पुरूष उमेदवारांनाही दिलासा देण्यात आला आहे. त्यांना अवजड वाहन चालविण्याचा तीन वर्षांच्या अनुभवाच्या अटीमध्ये शिथीलता करण्यात आली आहे. त्यानुसार अवजड वाहन चालविण्याचा १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही भरतीसाठी पात्र ठरतील. --------अर्ज करण्यास मुदतवाढमहामंडळामार्फत चालक व वाहक पदाच्या ८ हजार २२ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. बारा जिल्ह्यांमधील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण अटी शिथील केल्याने आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. इच्छुकांना आता दि. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा होणार आहे.
एसटी भरतीत इच्छुकांना दिलासा : अनुभवाची अट शिथील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 8:01 PM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत चालक व वाहक पदाच्या ८ हजार २२ पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे.
ठळक मुद्देतीन वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करून एक वर्ष करण्याचा निर्णय बारा जिल्ह्यांमधील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतपुरेसे उमेदवार मिळेनात, महिलांचा अत्यल्प प्रतिसाद