लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करून देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. बुधवारी महामंडळाने सर्वाधिक अशा १८९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ३३३ वर पोहोचली आहे. याशिवाय आतापर्यंत महामंडळाने ११,०२४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने निवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालक कर्मचाऱ्यांच्या नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाने जाहिरात दिली आहे. महामंडळाने आतापर्यंत ११,०२४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले, तर २७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.
त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. महामंडळाने आतापर्यंत ३०७९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर आज १८९ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १३३३ वर पोहोचली आहे.
५५,००० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली तरी अद्यापही काही कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. त्यानुसार कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.