मुंबई : दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचे नियोजन केले आहे. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंतच ही भाडेवाढ लागू राहण्याची शक्यता आहे. साध्या व निमआराम सेवांसाठी १0 टक्के आणि वातानुकूलित सेवांसाठी २0 टक्के भाडेवाढ असेल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. खासगी बस कंपन्या दिवाळीत तिकीटदरात वाढ करून चांगलीच कमाई करतात. हे पाहता एसटी महामंडळानेही तिकीट दरात तात्पुरती वाढ करण्याचे नियोजन केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गणेशोत्सव व आषाढी एकादशीदरम्यान एसटी महामंडळाकडून भाडेवाढ लागू करण्यात आली नाही आणि ऐन दिवाळीत ही भाडेवाढ करण्याचे नियोजन केले आहे. या हंगामी भाडेवाढीमुळे एसटीला जवळपास १० कोटींचा फायदा होणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळाकडून नियमित बसेसबरोबरच १८ हजार ५४३ जादा बसेसही सोडण्यात येणार आहेत. ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस धावणार आहेत. त्यामध्ये औरंगाबाद प्रदेशासाठी ३,२३४; अमरावती प्रदेशासाठी १,0९२; पुणे प्रदेशासाठी ४,२८४; नागपूर प्रदेशासाठी ९८७ आणि नाशिक प्रदेशासाठी ३,८४३ बसगाड्यांचा समावेश आहे. मुंबई प्रदेशातून ३,६३३ बसेस सोडण्यात येतील. मागील वर्षी एकूण १७,५५0 जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)या भाडेवाढीसंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने बोलण्यास नकार दिला. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना विचारले असता, एसटी महामंडळात बैठक होणार असून, त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मात्र खासगी बस कंपन्यांकडून दिवाळीत भरमसाठ वाढ केली जाते. आम्ही १० टक्के भाडेवाढ केली तर ती फारच कमी होते, असेही ते म्हणाले.
दिवाळीसाठी एसटीची हंगामी भाडेवाढ?
By admin | Published: November 04, 2015 3:27 AM