मुंबई : एक वर्ष उलटूनही एसी शिवशाही बस एसटीच्या ताफ्यात दाखल झालेली नाही. मात्र ही बस ताफ्यात लवकरच दाखल होईल, अशी पुन्हा एकदा घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. एसटीकडून मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. एसटी महामंडळाच्या कारभाराचे पूर्णत: मराठीकरण करण्यासाठी आग्रही असेन, असेही ते म्हणाले. खासगी वाहतुकीकडे गेलेल्या एसटीच्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाने गेल्या वर्षभरात चांगलीच कंबर कसली आणि अनेक सुविधा प्रवाशांसाठी आणण्याचा निर्णय घेतला. यात सर्वांत महत्त्वाची घोषणा व मोठा प्रकल्प असलेल्या एसटीच्या एसी शिवशाही बसचाही समावेश होता. परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेत जानेवारी २0१६च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे काही योजनांचे लोकार्पण केले. त्या वेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. परंतु ही बस नियोजित कालावधीत एसटीच्या ताफ्यात दाखल झाली नाही. (प्रतिनिधी)>कारभाराचे पूर्णत : मराठीकरण करणारसंपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या अभिसरणाचे काम एसटीने गेली कित्येक वर्षे अखंडपणे सुरू ठेवले आहे. यामध्ये एसटी कामगारांचा मोलाचा वाटा आहे. यापुढे सर्वसामान्य मराठी माणसाच्या मातृभाषेचे संवर्धन करण्यासाठी एसटी महामंडळाने वेळोवेळी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणूनच एसटीच्या कारभाराचे पूर्णत: मराठीकरण करण्यासाठी आग्रही असेन, असे प्रतिपादन या वेळी त्यांनी केले. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल व अन्य अधिकारीही उपस्थित होते.
एसटी शिवशाही बस लवकरच - रावते
By admin | Published: February 28, 2017 4:36 AM