मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई व दिल्ली या देशातील दोन्ही प्रमुख विमानतळांवर सातत्याने अभूतपूर्व गर्दी होत आहे. १० डिसेंबरला तर दिवसभरात मुंबईविमानतळावर १ लाख ५० हजार ९८८ प्रवासी होते. आजवर देशांतर्गत प्रवासासाठी दीड तास आधी विमानतळावर पोहोचले तरी चालायचे; पण आता देशांतर्गत विमान प्रवासासाठीदेखील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाप्रमाणे तीन तास आधी पोहोचावे, अशा सूचना विमानतळ प्रशासनाने दिल्या आहेत. दिवसाकाठी जवळपास ८५० विमानांची आवक-जावक होणाऱ्या मुंबई विमानतळावर अचानक गर्दी वाढण्यामागे काय कारण आहे? यामुळे प्रवाशांची कशी गैरसोय होत आहे आणि यावर उपाय काय?
प्रशासन काय करतेय?
गर्दी नियंत्रणासाठी पॅसेंजर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची नेमणूक. सुरक्षा तपासणी व हातातील सामानाच्या तपासणीसाठी ठेवलेल्या ट्रेची हालचाल जलद व्हावी, याकरिता विशेष कर्मचाऱ्यांची व्यवस्था ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ड्युटी मॅनेजरची नेमणूक परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी इमिग्रेशन सेंटरमध्ये दिशादर्शनासाठी विशेष पथकाची नेमणूक, विमानाच्या वेळेनुसार प्रवाशांना प्राधान्यक्रम
प्रवाशांची काय गैरसोय होते?
- गर्दी वाढल्यामुळे विमानतळावर प्रवेशासाठी जे गेट आहे, तिथूनच रांग लागायला सुरुवात होत आहे.
- आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बोर्डिंग पास घेणे आणि सामान तिथे सोडणे याकरिता पुन्हा मोठ्या प्रमाणावर रांग होत आहे.- यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सुरक्षा तपासणी (आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यानंतर इमिग्रेशन चेकिंग होते.) इथेदेखील मोठी गर्दी होत आहे.
- सातत्याने वाढणाऱ्या या गर्दीमुळे आधी जी प्रक्रिया एक ते दीड तासात होत होती, त्याला आता तीन तास लागत आहेत.- त्यामुळे जर एखादा प्रवासी ऐनवेळी आला तर त्याला प्रक्रियेतील विलंबामुळे विमान चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गर्दी का होत आहे?
- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळे विमान प्रवाशांची संख्या घटली होती. आता मात्र निर्बंध हटल्याने लोकांनी विमान प्रवासाला प्राधान्य दिले आहे.
- डिसेंबरच्या महिन्यात अनेक लोक सुट्टी घेऊन प्रवासासाठी जातात. निर्बंध हटल्यामुळे लोकांनी बुकिंग केले आहे.
- उपलब्ध माहितीनुसार, २०१९ च्या तुलनेत यंदा देशांतर्गत प्रवासाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या प्रमाणात २०१९ च्या तुलनेत ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"