मुंबई : गेल्या महिन्याभरापासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी संप सुरू आहे. या संपात सहभागी असणाऱ्या तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा फटका बसला आहे. परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन सोमवारपासून जमा झाले आहे. यात संपात सामील नसलेल्या सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह १०० टक्के सुधारित वेतन मिळाले आहे.
महिन्याभरापासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांचा संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. मात्र, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून मोठी वेतनवाढ आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारपासून एसटी महामंडळातील जे कर्मचारी संप काळात नियमित कामावर हजर राहिले आहेत. त्याच कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येत आहे. एसटी महामंडळाने १०० टक्के कामगारांचे वेतन ७ तारखेला केल्याचा दावा केला आहे. यात मोठ्या संख्येने संपापासून दूर असलेले यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीसह १०० टक्के पगार जमा झाला आहे.
२० हजारांहून अधिक कर्मचारी वेतनाविना सुमारे २० हजार एसटी कामगार ऑक्टोबरपासूनच संपावर असल्याने त्यांना वेतनवाढ मंजूर झाली असली, तरी नोव्हेंबर महिन्यातील शून्य उपस्थितीमुळे त्यांच्या खात्यात पगार जमा झालेला नाही. मात्र सर्वच एसटी कामगारांना मिळणारी पगारातील तफावत त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे.