मुंबई: मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अनेक आगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे, पण अद्यापही काही ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलक कर्मचाऱ्यांना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी थेट इशाराच दिला आहे.
कारवाई मागे घेणार नाहीसोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना चारवेळा कामावर हजर राहण्याची संधी दिली. त्यांच्यावरील सर्व कारवाई परत घेऊ, असेही त्यांना सांगितले. दिवाळीच्या अगोदर सरकारने 50 एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या, 28 युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. पण, अजूनही काही कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आता या कामगारांवरील कारवाई मागे घेता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती अनिल परब यांनी दिली.
कर्मचाऱ्यांना चारवेळा संधी दिलीपरब पुढे म्हणाले, सरकारने चार पावले पुढे नेली होती. मी स्वतः कामगारांना कारवाई होऊ नये, यासाठी चारवेळा संधी दिली. सरकारकडून वेळोवेळी आवाहनही केले. पण, एसटी कामगार कामावर परतले नाही. त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य करुनही ते आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले आहे. आता त्यांच्यावरील कारवाई मागे घेता येणार नाही. ज्यांना कारवाई मागे व्हावी असे वाटत असेल, त्यांनी आधी कामावर रुजू व्हावं, त्यानंतर आम्ही बोलायला तयार आहोत, असंही ते म्हणाले.