लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील अनेक कालावधीपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एसटी सेवा बंद होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे कोरोना कालावधीसाठी भाडेवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही.
फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटी बसेसच्या विशेष फेºया धावत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका आसनावर एकच प्रवासी बसविला जातो. फक्त २२ प्रवासी बसमध्ये घेतले जातात. त्यामुळे महामंडळाच्या तोट्यात भर पडत आहे. तोटा भरून काढण्यासाठी, तो कमी करण्यासाठी महामंडळाने दीडपट भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून सरकारला पाठवला आहे.
तिकीट पाच रुपयांनी महागणारसध्या पहिल्या टप्प्यासाठी एसटीकडून १० रुपये तिकीट आकारले जाते. भाडेवाढीस राज्य सरकार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी दिल्यास १० रुपयांचे तिकीट १५ रुपये होईल.