मुंबई : एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रवासी करापैकी १० टक्के भांडवली अंशदान देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, त्यामुळे दरवर्षी ४00 कोटी रुपये वाचणार असल्याचे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. अवैध वाहतूक, वाढलेले भाडे, नादुरुस्त बसेस यामुळे प्रवासीसंख्या कमी होत आहे. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पगार देणेही कठीण होऊन बसले आहे. एकूणच आर्थिक परिस्थिती पाहता प्रवासी करात सूट देण्यात यावी, अशी मागणी एसटी महामंडळाकडून वारंवार करण्यात येत होती. सध्या १७.५0 टक्के या दराने प्रवासी कराची रक्कम महामंडळाकडून शासनास अदा करण्यात येते. यापैकी उर्वरित ५.५0 टक्के शासनाकडून एसटीला भांडवली अंशदान देण्यात येते. यात आणखी पाच टक्क्यांनी वाढ करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर यावर निर्णय घेत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार प्रवासी कराचा दर १७.५ टक्के इतकाच ठेवून महामंडळाने ७.५ टक्के प्रमाणे प्रवासी कराची रक्कम शासनास अदा करावी व उर्वरित १० टक्के कराची रक्कम शासनाचे भांडवली अंशदान म्हणून महामंडळाने समायोजित करावी, असे नमूद केले आहे. यामुळे एसटी महामंडळाचे वर्षाला जवळपास ४00 कोटी रुपये वाचणार आहेत.
एसटीचे दरवर्षी ४00 कोटी रुपये वाचणार
By admin | Published: July 13, 2015 1:44 AM