मुंबई - राज्यात सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाचा तिढा अद्याप कायम आहे. आज झालेल्या चर्चेच्या फेरीनंतरही एकटी कामगारांचा संप कायम आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याचे आवाहन केले असून, एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितल्या प्रमाणे मी राज्याच्या महाधिवक्त्यांशीही बोलणार आहे, असे सांगितले. तसेच एसटीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया ही एक-दोन दिवसांमध्ये होणारी नाही, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.
गेल्या १०-१२ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. दरम्यान आज या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी संघटनेचे पदाधिकारी गुजर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र त्यामधूनही तोडगा निघाला नाही.
या चर्चेबाबत माहिती देताना अनिल परब यांनी सांगितले की, कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये फेरबदल करता येत नाही. तसेत समितीचा जो काही अहवाल असेल, त्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असे मी या प्रतिनिधींना सांगितले. दरम्यान या चर्चेवेळी पदाधिकाऱ्यांनी महाधिवक्त्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार मी राज्याच्या महाधिवक्त्यांशी बोलणार आहे, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन परब यांनी केला.
एसटीच्या लांबलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विलिनिकरणाचा निर्णय आणि विलिनिकरणाची प्रक्रिया एक-दोन दिवसांत होत नाही. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी कमिटीला वेळ देण्यात आली आहे. त्या वेळेत काम होईल, असेही अनिल परब यांनी सांगितले.