मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी संपाबाबत सोशल मीडियावरून विविध अफवा पसरविण्यात येत होत्या. या अफवा पसरविणे एसटी कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एसटी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता बदली झाल्याने या कर्मचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एक महिन्याहून अधिक काळापासून राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे तर खाजगी वाहन चालक प्रवाशांची लूट करीत आहेत. भरघोस वेतनवाढ देऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान, कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, राज्यभरातील २५० आगारांपैकी ६७ आगारांतील वाहतूक सुरू झाली आहे. मात्र संप अद्याप सुरूच आहे. त्यातील अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास इच्छुक आहेत; मात्र काही कर्मचारी त्यांना रुजू होऊ देत नाहीत. तसेच कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग वाढवा म्हणून अफवा पसरविल्या जात आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे आता हाल होणार आहेत. या संपामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून यात प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
एकवेळ कारवाई परवडली; पण बदली नको रे बाबा ! एसटी कर्मचारी आपल्या गावाजवळच्या ठिकाणी कामाला आहेत. त्यामुळे त्यांना शेती आणि इतर व्यवसायांतही लक्ष देता येते. पण, तीन ते चार तास अंतराच्या ठिकाणी बदली केल्यास त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे एक वेळ निलंबनाची कारवाई चालेल; पण बदली केल्यास अडचणी वाढतील, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगरसह राज्यातील इतर विभागांनी या बदल्या केल्या आहेत.
एका आगार व्यवस्थापकाचे निलंबन एसटी संपाबाबत पोस्ट करताना परिवहन मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या एका आगार व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली असून, त्याचे निलंबन करण्यात आले आहे.