दापोली : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील एका चालकाची सध्या चर्चा जोरात सुरू आहे. दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे काल चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले होते.
चालक अशोक वनवे हे मुळचे बीड येथील असून ते नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहेत. सध्या कोकणात एसटी सेवा सुरळीत आहे, मात्र आता चालकाने बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाल्यामुळे दापोलीत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. काल आज दुपारी 3 वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर चालक अशोक वनवे यांची ड्युटी होती शिवशाही बस प्रवाशांसह घेऊन ते ठाण्याकडे मार्गस्थ झाले, मात्र हा प्रकार दापोली बस स्थानकात चर्चेचा विषय ठरला .
काय म्हणाले अशोक वनवे?माझ्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा, असे सांगितले. कामावर न आल्यास मेमो मिळेल अशी भीती होती. आमचे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही. अवघ्या 13 हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे? हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे चालक अशोक वनवे यांनी सांगितले. तसेच, आमच्या मागण्यांना आता आश्वासने नकोत तर आमचे दुःख समजून घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा, असेही चालक अशोक वनवे म्हणाले.
17 एसटी कर्मचारी संघटनांची महत्वाची बैठकगेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे. सध्या 250 बस आगार पैकी 160 बस डेपो बंद आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, मुंबईतही 17 एसटी कर्मचारी संघटनांची आज महत्वाची बैठक होणार आहे. याशिवाय, एसटीचा प्रश्न आता न्यायालय गेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होणार आहे.