मुंबई - एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनिकरणासाठी एसटी कामगारांचा सुरू झालेला संप अद्यापही कामय आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती एसटी कामगारांसोबत संपात उतरलेले भाजपा नेते गोपिचंद पडळकर यांनी दिली.
गोपिचंद पडळकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही अनेक मुद्दे राज्य सरकार समोर मांडले. अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव असो किंवा विलीनीकरणाचा असो एकंदरीत चर्चा सकारात्मक झालेले आहे. विलीनीकरणाच्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत. संध्याकाळी सहा वाजता याबाबत अधिकृत निर्णय होईल तो जाहीर केला जाईल, असे गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून सुरू असला तरी आणि एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार नाही, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन राज्यभरातील बससेवा ठप्प झाली असतानाच विद्युत बस भाडेतत्त्वाने घेण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला महामंडळाने ९ नोव्हेंबरला 'वर्क ऑर्डर' दिल्याचे स्पष्ट झाले आहे. एसटी महामंडळाच्या मालकीची 'शिवाई' विद्युत बसची बांधणी रखडलेली असतानाच खासगी विद्युत बससाठी थेट 'वर्क ऑर्डर' देण्याचा प्रकार पाहता, हे खासगीकरणच असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. खासगी शिवशाहीच्या धर्तीवर महामंडळाच्या या बस धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.