मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सपावर असलेल्या एसटी कर्मचारी ४१ टक्के पगारवाढ मिळाल्यानंतरही संप मागे न घेतल्याने आता त्यांच्यावर रविवारपासून थेड व कडक कारवाई सुरू होणार आहे. त्यांना शनिवारपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा कठोर कारवाई करू, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता.एकीकडे पगारवाढ व दुसरीकडे कारवाईची भीती यांमुळे सुमारे ६ हजार कामगार शनिवारी कामावर रुजू झाले. त्यामुळे कामावरील कामगारांची संख्या १८ हजारांवर गेली आहे. त्यामुळेच आज दिवसभरात राज्यात ९३७ बसगाड्या धावल्या. काही ठिकाणी बसेसवर दगडफेक झाली, तर काही डेपोंबाहेर निदर्शने झाली.
वाहतूक हळूहळू पूर्वपदावरदेशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. मात्र ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. खोत आणि पडळकर यांनी माघार घेतल्याने १८,०९० कर्मचारी कामावर रुजू झाले असून, ७४,१७६ कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत.दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवस माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी विलीनीकरण झाल्याशिवाय आझाद मैदानातून जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन दिवसात त्यांच्या भूमिकेत बदल झाला, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
१३ हजारांनी केला प्रवास- कोल्हापूर, सांगली, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात बससेवा अंशत: सुरू झाली असून शेवगाव (अहमदनगर) बसवर दगडफेक झाली. - शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ९३६ एसटी धावल्या. त्यातून १३,००७ प्रवाशांनी प्रवास केला. यात ४९ शिवनेरी, १५८ शिवशाही, ९ हिरकणी आणि ७२९ साध्या बसचा समावेश आहे.