मुंबई : गेली अनेक वर्षे एसटीच्या चालक, वाहक व यांत्रिकी कामगारांचा असलेला गणवेश लवकरच बदलणार आहे. एसटी कामगारांना नवा ‘लूक’ असलेला गणवेश मिळणार आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेकडून एसटी कामगारांच्या गणवेशाचे डिझाइनचे सादरीकरण एसटीच्या मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात सादर करण्यात आले. या वेळी एसटीतील सर्व कामगार संघटना उपस्थित होते. कामगार संघटनांकडून गणवेशाबाबत काही बदलही सूचवण्यात आले. एसटीच्या चालक, वाहकांचा गणवेश हा सध्या खाकी आहे, तर यांत्रिकी विभागातील कामगारांचा गणवेश हा निळ्या रंगाचा आहे. वर्षानुवर्षे त्यांच्या असलेल्या गणवेशात काहीच बदल न झाल्याने एसटी महामंडळाने नवा लूक असलेला गणवेश कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. गेली सहा महिने नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एसटी आगारांत जाऊन कामगारांचा मुलाखती घेऊन त्यांचे मत जाणून घेत आहे. त्यांच्या गरजेनुसार गणवेश कसा तयार करता येईल, याचा अभ्यास इन्स्टिट्यूटकडून केला जात होता. त्यातून त्यांनी तीन प्रकारचे डिझाइन बनवले आहे आणि त्यामधून एक डिझाइन कामगारांच्या गणवेशासाठी निवडले जाईल. कामगार संघटनांसोबत झालेल्या बैठकीत आणि गणवेशाचे डिझाइन केलेल्या सादरीकरणात चालक-वाहकांच्या गणवेशाचा रंग खाकी असावा, परंतु तो पोलिसांच्या खाकीपेक्षा वेगळा ठेवण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे, गणवेशाचे कापड हे चांगल्या दर्जाचे असावे, असा आग्रही धरल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. बदलत्या आधुनिक शैलीला, वेगवेगळ्या हवामानात सूट होणारा असा गणवेश एसटी कामगारांसाठी लवकरच येणार आहे. (प्रतिनिधी)>बदलत्या काळानुसार एसटी कामगारांच्या गणवेशात कोणीही कधीच बदल सूचविला नाही. मात्र आता एसटी कामगारांचा गणवेश बदलून नवा लूक मिळणार ही चांगली बाब आहे. मात्र गणवेशाचे कापड हे चांगल्या दर्जाचे असावे, अशी आम्ही मागणी केली आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस-महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस>कापड दर्जेदार असावे आणि ते वेळेवर मिळाले पाहिजे, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत. कामगारांना ज्या गणवेशात समाधान मिळेल, असा गणवेश असावा असे मत आम्ही मांडले आहे. - हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी-महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
एसटी कामगारांचा गणवेश बदलणार
By admin | Published: July 18, 2016 5:09 AM