नाशिक : जुने नाशिक परिसरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बागवानपुरा, कथडा, कोकणीपुरा, चौकमंडई भागात राजकिय पक्षाचे दोन गट आमने-सामने आल्याने दंगलसदृश्य परिस्थीती निर्माण झाली होती. दगडफेक झाल्याने सुमारेच पाच चारचाकी वाहनांसह दुचाकींचे नुकसान झाले. समाजकंटकांनी वाहनांवर दगडफेक करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दंगलनियंत्रण पथकासह स्ट्रायकिंगच्या तुकड्यांना परिसरात पाचारण करत परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. अतिसंवेदनशील असलेल्या या परिसरात निवडणूकीमध्ये वाद-विवादाची शक्यता वर्तविली जात होती. निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी या भागात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला नव्हता यामुळे दगडफेकीची घटना घडल्याचे बोलले जात आहे. समाजकंटक घोषणाबाजी करत परिसरात दगड भिरकावीत असतानाही भद्रकाली पोलीस उशिरा घटनास्थळी पोहचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. परिसरात अघोषित संचारबंदी लागू करण्यात आली आहे.