मुंबई - एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार आहेत. त्यापैकी या महिन्यातील चार दिवसांचा पगार कापला जाणार. तर उरलेल्या 32 दिवसांचा पगार पुढील सहा महिन्यात कापला जाणार आहे. ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतनासह अन्य मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसलं होतं. उच्च न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवल्याने अखेर 96 तासांनंतर शुक्रवारी मध्यरात्री संप मागे घेण्यात आला होता.
या निर्णयामुळे अगोदरच तुटपुंजा पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हालाखीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. तसेच अगोदरच संतप्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळू शकतात. संप केल्यास दंडात्मक कारवाई म्हणून प्रत्येक दिवसाकाठी आठ दिवस याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याची तरतूद नियमात आहे. त्यानुसार संपकरी कर्मचाऱ्यांचे दंडात्मक कारवाईचे 32 दिवस आणि संपाचे 4 दिवस असे मिळून एकूण 36 दिवसांचे वेतन कापण्यात येईल, असे परिपत्रक एसटीकडून जारी करण्यात आले. चार दिवसांच्या संपामुळे महामंडळाचे 125 कोटींचे उत्पन्न बुडाले होते.
एसटी प्रशासनाच्या या निर्णयानंतर कर्मचारी संघटनांना नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय अयोग्य असून त्याविरोधात औद्योगिक न्यायालयात दाद मागणार असल्याचे इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. आम्ही संपावर जाण्यापूर्वी एसटी प्रशासनाला रीतसर नोटीस दिली होती. त्यामुळे न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला असला तरी ही कारवाई खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विविध पक्ष संघटनांसह सर्वच स्तरातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता.