मुंबई : समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनात बोलताना केले. अभाविपच्या प्रदेश अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी पूर्व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. पूर्व कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामुळे अभाविपमधील ते मंतरलेले दिवस जिवंतपणे अनुभवायला मिळाले, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविली. आधी इंग्रजांनी पुरोगामी व आधुनिकतेचे चित्र निर्माण केले. तर, स्वातंत्र्यानंतर विरोधकांनी पुरोगामी, प्रतिगामी अशी लेबल चिकटवून समाजात अपसमज निर्माण केल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ज्यांना समाजकारण व राजकारणात स्वत:चे प्रभुत्व व तरुण नेतृत्व निर्माण करता आले नाही अशांनी काही क्षेत्रातील वर्चस्वाच्या जोरावर समाजात अपसमज पसरविण्याचा जोरदार प्रयत्न केला. यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेलाच धक्का बसला असून, या धक्क्यातून सावरण्याचे कार्य अभाविपच करू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हा छात्रशक्तीचा जय... हा राष्ट्रभक्तीचा जय...’ या अधिवेशन थीम साँगचे प्रसारण करण्यात आले. निकिता भागवत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतास कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केले. आपल्या विद्यार्थीदशेत अभाविपशी जोडले गेलेल्या विविध क्षेत्रांतील पूर्व-कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर यांनी ‘भारत अनुरूप शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. देशात बदल घडविण्यासाठी बाह्य तत्त्वज्ञानाची गरज नाही. आपण स्वत: अभ्यास करून देशात बदल घडवायला हवा. आपल्या देशाची संस्कृती विद्यार्थ्यांना सन्मान देणारी आहे. मात्र, कृषिप्रधान भारतातील विद्यार्थ्यांचा मातीशीच संबंध येत नाही. तेंव्हा आत्महत्यांचे सत्र थांबण्याची अपेक्षा कशी करायची, असा सवाल आंबेकरांनी केला. देश फक्त महाशक्तीच नाही, तर एक उत्कृष्ट राष्ट्र व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आंबेकर म्हणाले. (प्रतिनिधी)
ढोंगी पुरोगाम्यांविरुद्ध उभे राहायला हवे!
By admin | Published: December 26, 2015 2:02 AM