सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने रिजेन्सी अंटेलिया येथे २०० बेडचे कोविड रुग्णालय उभारले आहे. रुग्णालयासाठी कोट्यवधी किमतीचे साहित्य खरेदीला स्थायी समितीने मान्यता दिली असून लवकरच रुग्णालयाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, आरोग्य सुविधेसाठी राज्य शासनाच्या मध्यवर्ती रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. शहरात कोरोनाची लाट आल्यानंतर महापालिकेने राज्य शासनाचे कॅम्प नं-४ मधील शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. तसेच खाजगी रेडक्रॉस रुग्णालयात कोविडच्या सुखसुविधा देऊन कोरोना रुग्णावर उपचार सुरू केले. त्याशिवाय शांतीनगर येथील साई प्लॅटिनियंम हे खाजगी रुग्णलाय दरमहा २० लाख रुपये भाडेतत्वावर घेतले. महापालिका अभ्यासिका, वेदांत महाविद्यालय, भिवंडी आमंत्रण बिल्डिंग, नवीन तहसील कार्यालय इमारत आदी ठिकाणी कोविड रुग्णासाठी आरोग्य केंद्र सुरू केले.
रिजेन्सी अंटेलिया येथील विकसित जागा महापालिकेकडे हस्तांतरीत झाल्यावर, महापालिकेने त्या ठिकाणी कोविड रुग्णलाय उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. अद्यावत रुग्णालय उभारण्यासाठी तब्बल १० कोटी पेक्षा जास्त साहित्य खरेदीचा विषय गेल्या स्थायी समिती सभेत मंजूर केला. मात्र सदर9 साहित्याचे दर दामदुप्पट असल्याने प्रस्ताव वादात सापडला. महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, आरोग्य उपायुक्त सुभाष जाधव आदींनी वस्तूच्या खरेदी बाबत चर्चा करून साहित्याच्या किमती कितीतरी पट्टीने कमी केल्या. याप्रकारने खरेदी प्रक्रियेतील सावळागोंधळ उघड झाल्यावर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले.
रुग्णालयाच्या सुविधेसाठी पुन्हा साहित्य खरेदी
गेल्या आठवड्यात महापालिका स्थायी समितीने कोरोना रुग्णालयासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी साठी १० कोटी पेक्षा जास्त किंमतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तसेच पुन्हा रुग्णालयासाठी अद्यावत शस्त्रक्रिया विभाग, डॉक्टरांना राहण्यासाठी खोल्या, चेंबर, नवीन रस्ता बांधण्यासाठी १ नोव्हेंबरच्या स्थायी समिती मध्ये प्रस्ताव आले आहेत.