मुंबई : देशातील एकूण एक ते पंच तारांकित हॉटेलमध्ये या घडीला सुमारे १ लाख २० हजार खोल्यांची क्षमता आहे. मात्र पुढील चार वर्षांत त्यात १ लाख ८० हजार नव्या अतिरिक्त खोल्यांची भर घालण्यासाठी हॉटेल उद्योगाने ‘ब्रँड इंडिया’ची हाक दिली आहे. या घोषणेअंतर्गंत २०२० सालापर्यंत देशात येणाऱ्या १ कोटी पर्यटकांसाठी एकूण ३ लाख खोल्या उपलब्ध असतील.या उपक्रमामध्ये शासनाने पायाभूत सुविधा उभारून हातभार लावावा, असे आवाहन फेडरेशन आॅफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स आॅफ इंडिया (एफएचआरएआय) या हॉटेल जगतातील शिखर संघटनेने केले आहे. एफएचआरएआयचे अध्यक्ष भरत मलकानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील इंदूर येथे २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘ब्रँड इंडिया’ संकल्पनेवर कन्व्हेन्शन पार पडेल. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांची प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय देशातील ५००हून अधिक हॉटेल व्यावसायिकांचे मालक भाग घेतील. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकारी प्रयत्न वाढवून उत्पादने आणि सेवांमध्ये ब्रँड इंडिया वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल, असेही मलकानी यांनी सांगितले.ब्रँड इंडियामार्फत पर्यटन अधिकारी, योजनाकर्ते, गुंतवणूकदार यांना एकाच मंचावर विचारविनिमयासाठी आमंत्रित केले आहे. ही घोषणा पूर्ण करण्यासाठी हॉटेल जगताने ब्रँड इंडियांतर्गत २ लाख कोटी उभारण्याचा संकल्प केला आहे. इंदोरमध्ये पार पडणाऱ्या या ब्रँड इंडियाच्या कन्व्हेन्शनमध्ये हॉटेल उद्योगासाठी आर्थिक उभारणी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक महसूल निर्माण करणे, मोबाइल वॉलेट्स तंत्रज्ञानाच्या वापराने डिजिटल मार्केटिंग, सजावटींतील नवीन ट्रेंड्स यांचा समावेश असेल. कन्व्हेन्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ टीज म्हणजेच टॅलेंट, ट्रॅडिशन, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी यांवर भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)>ब्रँड इंडियाचा फायदा काय? ब्रँड इंडियाच्या माध्यमातून देशातील अॅडव्हेंचर, वेलनेस, स्पोटर््स, इको टुरिझम, फिल्म, ग्रामीण आणि धार्मिक तसेच अन्य उत्पादनांचा प्रसार केला जाईल.शेकडो व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी मिळेल.या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात हॉटेल उद्योगाचे जाळे विणले जाईल. शिवाय लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक देशात आकर्षित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे परकीय चलनही मिळेल.
तारांकित हॉटेल उद्योगाचे ब्रँड इंडिया!
By admin | Published: September 20, 2016 5:07 AM