नवी मुंबई/रत्नागिरी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस आंब्याचे भाव अक्षय तृतीयेपूर्वीच गडगडले असून, १०० ते ५०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री होत आहे. बाजार समितीमध्ये शुक्रवारी १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे यंदा आंब्याचे बाजारभाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल अखेरपर्यंत समाधानकारक आवक होत नव्हती. दोन दिवसांपासून आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी कोकणामधून ७५ हजार ५५५ पेट्या व इतर राज्यांमधून ४१ हजार ५९१ पेट्यांमधून आंबा विक्रीसाठी आला. हंगामामध्ये प्रथमच १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात हापूस आंबा २०० ते ८०० रुपये डझन दराने विकला जात होता.
कर्नाटक हापूस ६० ते १०० रुपये किलोने विकला जात होता. त्याचे दरही कमी होऊन ४० ते ६० रुपये किलो झाले आहेत. बदामी ३५ ते ६५ रुपये किलो व लालबाग १५ ते ३५ रुपये किलो दराने विकला जात आहे. देवगड हापूसचा हंगाम पुढील पंधरा दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई बाजार समितीत दर कोसळल्याने कोकणातील बागायतदार निवडक आंबा मुंबईत पाठवित असून, उर्वरित आंबा कॅनिंगसाठी पाठवत आहेत. पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे हापूसचे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे.या वर्षी लांबलेली थंडी, अवेळी पावसाने वातावरण बदल झाल्याने मोहोर जळून गेला. त्यामुळे हापूस आंब्याला फटका बसला. दर्जेदार आंब्याच्या ७ ते ४ डझनाच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित लहान आकाराचा आंबा किलोप्रमाणे विकला जात आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कॅनिंग सुरू झाले असून, एका किलोला २५ रुपये इतका दर मिळत आहे. यंदाच्या हंगामात आंबा कमी असूनही दर फार न वाढल्याने बागायतदार नाराज दिसत आहेत.
मुंबईमध्ये शुक्रवारी कोकण व दक्षिणेकडील राज्यांमधून १ लाख १७ हजार पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून, ग्राहकांना आंबा खरेदीसाठी हीच चांगली वेळ आहे. - संजय पानसरे, आंबा व्यापारी.