रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत योजनेतून तुरीची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडे संपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यादृष्टीने नाफेडने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. नव्याने अजून सुमारे नऊ लाख क्विंटल तूर खरेदी होईल, असा फेडरेशनचा अंदाज आहे.सोमवारी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्यातील एक लाख टन तूर खरेदीचे आश्वासन राज्य शासनाला दिले. यामुळे संपूर्ण यंत्रणा नवीन योजनेच्या अंमलबजावणीच्या कामाला लागली आहे. याचा अध्यादेश बुधवारपर्यंत जिल्हास्तरावर पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.या वर्षी खरीप हंगामात तूर उत्पादनाच्या खरेदीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्याला जबर फटका बसला. आंदोलनातून सरकारवर दबाव वाढला. यामुळे शासनाला तूर खरेदीसाठी तब्बल तीन योजनांचा आधार घ्यावा लागला. प्रारंभी केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेतून तुरीची खरेदी करण्यात आली. २२ एप्रिलनंतर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेतून तूर खरेदी झाली. आता केंद्रीय कृषी विभागाच्या आधारभूत तूर खरेदी योजनेतून तुरीची खरेदी होणार आहे. यामुळे संपूर्ण खरेदीचा अधिकार मार्केटिंग फेडरेशनलाच राहणार आहे. याच प्रमुख कारणाने इतर एजन्सीची जबाबदारी संपुष्टात येणार आहे. यामुळे मार्केटिंग फेडरेशनला आपले मनुष्यबळ वाढवावे लागणार आहे. तूर खरेदी झाल्यास बारदान्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून बारदाना केंद्राकडे वळता करण्यात आला आहे. व्हीसीएमएसचा पेच सुटणार-विदर्भ को. आॅप. मार्केटिंग फेडरेशनचा मुख्य व्यवसाय खताची विक्री करणे आहे. मात्र राज्य शासनाच्या आदेशामुळे त्यांनी तुरीची खरेदी केली. आता खताचा हंगाम असल्याने यात काय करायचे, असा पेच त्यांच्यापुढे होता. नवीन योजनेत केवळ मार्केटिंग फेडरेशनकडेच खरेदी राहणार असल्यामुळे व्हीसीएमएसचा पेच आपसूकच सुटणार आहे.विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि अकोला या चार ठिकाणांवर तुरीच्या पंचनाम्यातील खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे. तर यवतमाळच्या काही केंद्रांवर तुरीचे मोजमाप बाकी आहे.कोलकाता, भंडारा आणि धान उत्पादक प्रदेशातूनही बारदाना आणण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन लाख बारदाना पोहोचला आहे. समोरील खरेदी मार्केटिंग फेडरेशनच्या नेतृत्वात केली जाणार आहे.- डॉ. अतुल नेरकर,विभागीय पणन अधिकारी, विदर्भ विभाग, नागपूर
केंद्रीय कृषी योजनेतून तूर खरेदी सुरू
By admin | Published: May 10, 2017 2:10 AM