कोल्हापूर : अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी माझ्यावर दोषारोपपत्र दाखल असलेला खटला लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी झाली. पुण्यातील येरवडा कारागृहातील डॉ. तावडे याच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्याचे वकील अॅड. समीर पटवर्धन उपस्थित होते. पुढील सुनावणी २७ एप्रिलला ठेवण्यात आली आहे.ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘सनातन’चा साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याला २ सप्टेंबर २०१६ रोजी ‘सीबीआय’कडून एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर तो पुण्याच्या येरवडा कारागृहात ‘सीबीआय’च्या ताब्यात आहे.सोमवारी सुनावणीला प्रारंभ होण्यापूर्वी संशयित आरोपी समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन यांनी, अर्ज क्र. ९१ मधील अॅड. गोविंद पानसरे यांच्याबाबत कुटुंबीयांकडे केलेल्या काही कागदपत्रांच्या मागणीबाबत सरकारी वकिलांकडून काहीच माहिती दिली नसल्याचे सांगितले. त्यावेळी तपासी अधिकारी कुठे आहेत? असे न्यायाधिशांनी विचारताच खटल्याच्या एसआयटी पथकातील सहा. पो. नि. रमेश खुणे यांनी, न्यायालयात तपासी अधिकाऱ्यांचा लेखी म्हणणे सादर करत ते जोतिबा यात्रेच्या बंदोबस्तासाठी गेल्याचे सांगितले.त्यानंतर याच खटल्यातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे यांची पुण्याच्या येरवडा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीश बिले यांनी, व्हिडिओ कॉन्फरन्सवर दिसणाऱ्या व्यक्तीची, ‘डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे तुम्हीच का?’ अशी ओळख परेड घेतली. तुम्हाला प्रशासकीय अडचणींमुळे न्यायालयात हजर करता आले नसल्याचेही न्यायाधीशांनी त्याला सांगितले. तुमच्यावर आरोप निश्चितीबाबत सुनावणीला उच्च न्यायालयाने ५ जुलैपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले, तरीही तुमच्याशी बोलावे म्हणून ‘व्ही.सी.’द्वारे समोरासमोर आहे. तुमचे वकील अॅड. समीर पटवर्धन येथे असून तुम्हाला खटल्याबाबत काय सांगायचे आहे का? असेही न्यायाधीशांनी त्याला विचारले. त्यावेळी डॉ. तावडे याने, हा खटला लवकरात लवकर सुरू करा, अशी विनंती यावेळी न्यायाधीशांकडे केली.तुमच्यावरील सुनावणीस उच्च न्यायालयाची स्थगिती आहे, तरीही खटला लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगून न्यायाधीश बिले यांनी पुढील सुनावणी २७ एप्रिलला ठेवण्यात आल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)अध्यादेशापूर्वीच राणेंची नियुक्तीपानसरे खटल्यातील सरकारी वकील म्हणून अॅड. शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीबाबत आरोपींच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला होता. त्याबाबत तपासी अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांमार्फत सोमवारी न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले. त्यामध्ये सरकारी वकील शिवाजीराव राणे यांची या खटल्यातील नियुक्ती ही शासनाचा सुधारित अध्यादेश निघण्यापूर्वी केली असल्याने अॅड. राणे यांची नियुक्ती ग्राह्य धरावी, अशी विनंती न्यायालयात केली आहे. दि. २ सप्टेंबर २०१६ : डॉ. वीरेंद्र तावडे याचा पुण्यातील येरवडा कारागृहातून ‘सीबीआय’ पोलिसांच्या ताब्यातून कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) ताबा घेतला.दि. ८ सप्टेंबर २०१६ : डॉ. तावडेला आठ दिवसांची पोलिस कोठडी दि. २ डिसेंबर २०१६ : अॅड. पानसरे हत्याप्रकरणी डॉ. तावडेवर दोषारोपपत्र दाखल. दि. ९ डिसेंबर २०१६ : डॉ. तावडेशी व्हीसीद्वारे साधला न्यायाधीशांनी संवाददि. १० एप्रिल २०१७ : डॉ. तावडेशी व्हीसीद्वारे संवाद२० रोजी उच्च न्यायालयात अहवाल सादरअॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपासातील प्रगतीचा अहवाल एसआयटीमार्फत (विशेष पथक) २० एप्रिलला उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यातील तपासातील प्रगतीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करणे ‘एसआयटी’ला बंधनकारक आहे.
खटला लवकर सुरू करा--गोविंद पानसरे हत्या प्रकरण
By admin | Published: April 11, 2017 12:04 AM