लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपूर्ण राज्य मार्च २०१८ सालापर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘दरवाजा बंद’ अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित या कार्यक्रमाला बिग बी अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची प्रमुख उपस्थिती होती.पेयजल व स्वच्छता मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी २०१८ पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्त होतील, असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील २५० पैकी २०० शहरे हागणदारीमुक्त झालेली आहेत. मार्च २०१८पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त केले जाईल. महानायक अमिताभ बच्चन केंद्र सरकारच्या स्वच्छता विभागाचे सदिच्छा दूत झाल्यापासून देशातील स्वच्छतेचे अभियान एका वेगळ्या उंचीवर गेलेले आहे. त्यांचा अभिनय, आवाज व चेहरा यामुळे अडीच वर्षांपासून हागणदारीमुक्त अभियानात खूप प्रगती झाली आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, पुणे, नागपूर, वर्धा आणि गोंदिया हे ११ जिल्हे संपूर्णत: हागणदारीमुक्त झालेले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आभार मानले.अभियानाचे सदिच्छा दूत आणि बिग बी अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘दरवाजा बंद’ अभियानासाठी आणि या शीर्षकावर बरीच चर्चा केली. ‘दरवाजा बंद’चे दोन अर्थ मला वाटतात. ते म्हणजे दरवाजा बंद करून शौचास जायला हवे, ज्यामुळे आजारही बंद होतील. तर दुसरा म्हणजे चुकीचे काम करणाऱ्यांसाठीही दरवाजा बंद करणे होय. या अभियानासाठी ३ ते ४ जाहिराती व अनेक पोस्टर्स तयार केलेले आहेत. लवकरच ते सर्वत्र दिसतील. सध्यातरी हागणदारीमुक्त झालेल्या ११ जिल्ह्यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे. त्यांनी खरंच खूप मेहनत घेऊन आपला जिल्हा हागणदारीमुक्त केला आहे.या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय सचिव परमेश्वरन अय्यर असे विविध मान्यवर उपस्थित होते.स्वभाव, सवय, जबाबदारी बनवा!स्वच्छता ही नागरिकांनी स्वभाव, सवय आणि जबाबदारी बनवण्याची गरज केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, लोकांना स्वच्छता हा विषय नवा नाही. मात्र आता ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी स्वच्छतेला प्राथमिकता द्यायला हवी. पंतप्रधानांनी स्वछ भारत अभियान सुरू केल्यापासून देशातील स्वच्छतेचा दर ४१ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर गेलेला आहे. दोन लाखांहून जास्त गावे हागणदारीमुक्त झालेली आहेत.राज्यात एका वर्षात १९ लाख १७ हजार ६७० शौचालये तयार करण्यात आली.गेल्या अडीच वर्षांत ४० लाख ५१ हजार शौचालये बांधून तयार केली आहेत.राज्यात ३५% स्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे.१४९ तालुके, २४ हजार ८८४ गावे आणि १६ हजार ५८४ ग्रामपंचायती संपूर्णत: हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
‘दरवाजा बंद’ अभियानाचा प्रारंभ
By admin | Published: May 31, 2017 4:41 AM