ऑनलाइन लोकमत
सप्तश्रृंगगड (नाशिक), दि. १ - साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ संबोधल्या जाणा-या नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगगडावरील सप्तश्रृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. आज सकाळी सात वाजता देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यानंतर देवीची विधीवत पूजा करण्यात येऊन घटस्थापना करण्यात आली.
नवरात्रोत्सव कालावधीत मंदिर २४ तास खुले राहणार असून, न्यासाच्या प्रसादालयात उत्सव कालवधीत मोफत अन्नदान केले जाणार आहे. या कालवधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.
गडावर खाजगी वाहनांना प्रवेशबंदी केली असून नांदुरी ते सप्तशृंगगड अशा बसने भाविकांच्या सेवेसाठी बसस्थानक उभारण्यात आले आहे. भाविकांनी कुठल्याही बेवारस वस्तूला हात लावू नये , कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांततेत दर्शन घ्यावे गर्दीच्या काळात काही बेवारस वस्तू दिसल्यास पोलिसांना कळविणे व चेंगराचेंगरी होणार नाही याची भाविकांनी दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक देविदास पाटील यांनी केले आहे.
शारदीय नवरात्रोत्सव काळात धुळे ,जळगाव, नगर ,नाशिक, नंदुरबार, मुंबई व गुजरात सुरत, अहमदाबाद , बडोदा, नवसारी , या भागातील भावीक मोठ्या संख्येनी सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी येत असतात . यात्रा काळात एक अपर पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक दोन पोलीस निरीक्षक , सहा पोलीस उपनिरिक्षक दहा , १५९ पुरु ष व महिला पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखा तिन पोलीस अधिकारी व वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी ४७ असा बदोबस्त आहे. नवरात्र उत्सव काळात सर्व खबरदारीच्या उपाययोजना अवलंबविण्यात येत असून भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे व सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.