कोल्हापूर/शिरोळ : भूमाता संघटनेमार्फत प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर पदयात्रा मोहिमेला शुक्रवारी कुरुंदवाड येथून नदीच्या संगमापासून सुरुवात झाली.संगम ते उगम पंचगंगा प्रदुषण जागर पायी यात्रेचा प्रारंभ आज सकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुदवाड येथील संताजी घोरपडे समाधी स्थळावरुन झाला.
या जागर मोहिमेत संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, शिरोळचे आमदार उल्हास पाटील, शालिनी मुळीक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, गणपतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी माने यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. दुपारच्या सत्रात साताऱ्याचे खासदार उदयनराजे सहभागी होणार आहेत.भूमाता संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही मोहिम संघटनेने उघडली आहे. इचलकरंजी, वळिवडे या मार्गे नदीकाठावरून पायी चालत जाऊन नदी वाचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रयाग चिखली येथे नदीच्या उगमापर्यंत ७ जानेवारीपर्र्यत हा उपक्रम सुरु राहणार आहे.पंचगंगा नदीला मरणासन्न अवस्थेतून गतवैभवाकडे नेण्यासाठी प्रदूषणाची नदीकाठची ठिकाणे संगमापासून उगमापर्यंत सर्वांनी पाहावीत आणि आपण स्वत: या प्रदूषणात सहभागी होणार नाही, याची जाणीव व्हावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे.नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रदूषण रोखणे हाच एकमेव उपाय आहे, त्यासाठी भूमाता संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी जागरयात्रा हा त्यापैकीच एक आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून नदी स्वच्छ कशी करता येईल, या बाबतीत प्रबोधन केले जाणार आहे, अशी माहिती यावेळी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी दिली.मानवी साखळी २२ किलोमीटरची या लोकजागर यात्रेत शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, नांदणी, धरणगुत्ती आदी परिसरातील शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकही सहभागी झाले आहेत. कुरुंदवाड येथील सेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळावरुन या यात्रेस प्रारंभ झाला. तेथून नृसिंहवाडीच्या नदीघाटापासून २२ किलोमीटर लांब मानवी साखळीद्वारे या पंचगंगा नदी प्रदूषण जागर करण्यात आला.पदयात्रेच्या अग्रभागी जलकुंभया मोहिमेसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या अग्रभागी पंचगंगा नदीतील पाण्याचा जलकुंभ एका सजवलेल्या वाहनावर ठेवण्यात आला आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करा, पाणी वाचवा अशा आशयाच्या घोषणा देत तसेच जागृती करणारे फलक हाती घेत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्यासह अनेक मान्यवर या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.