कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून तूर उत्पादन घेण्याचे आवाहन केल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे उत्पादित झालेली सर्व तूर खरेदी करण्याची जबाबदारी सरकारवर आहे, असे सांगत, तातडीने तूर खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी केली.संघर्ष यात्रेनिमित्त कोल्हापुरात आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडून ३५०० रुपयांनी खरेदी केलेली तूर व्यापाऱ्यांनी ‘नाफेड’ला ५०५० रुपयांना विकली. तूर खरेदी बंद करून सरकारने व्यापाऱ्यांना लूटमार करण्याचा परवाना दिल्याची टीका विखे-पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर मोठे झालेले खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत सत्तेत गेल्यापासून शेतकऱ्यांना विसरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ग्रामसभेत ठराव कराशेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झाला पाहिजे आणि शेतीमालाला ५० टक्के नफा मिळेल एवढा भाव मिळावा, अशा आशयाचे ठराव १ मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी करावेत, तसेच ते राज्य सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन विखे-पाटील यांनी या वेळी केले. दर्शनासाठीही ‘संघर्ष’ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत अंबाबाईला साकडे घालण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मंगळवारी सकाळी अंबाबाई मंदिरात आले, तेव्हा देवीची आरती आणि शंखतीर्थ हे धार्मिक विधी सुरू असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत विखे-पाटील पितळी उंबऱ्याच्या आत गेले. मात्र, अजितदादांना बाहेरूनच देवीला नमस्कार करून शेजारील कट्ट्यावरून उडी टाकून मंदिराबाहेर ‘संघर्ष’ करत यावे लागले. (प्रतिनिधी)
तूर खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करा
By admin | Published: April 26, 2017 1:38 AM