मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे आपलं 'राज्य गीत' लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे केली आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे. मात्र, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे पत्र रिट्विट करत महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला. यावेळी जारी केलेल्या शासन अध्यादेशामध्ये हे राज्य गीत सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयात म्हटले, जाईल असा स्पष्टोल्लेख केला आहे. तरीही आपण केलेल्या सुचनेतून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती मनामनापर्यंत पोहचविण्याची आपली धडपड कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारश्याला प्रकाशझोतात आणण्याच्या या प्रवासात यापुढेही आपले सहकार्य लाभेल असा विश्वास आहे, असे म्हटले आहे.
अमित ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..." ह्या कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या गीताला गेल्या वर्षी दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे 'राज्य गीत' असा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच लावले जावेच हा आमचा आग्रह आहे, असे पत्रात म्हटले आहे.
शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी "जन गण मन अधिनायक जय हे..." ह्या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढ्यांना विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे, असे पत्रात म्हटले आहे.
त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..." हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरुपी प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा, ही विनंती. उद्या २७ फेब्रुवारी. 'मराठी भाषा गौरव दिना'च्या पूर्वसंध्येला आपण याबाबतचा शासकीय आदेश काढला तर सर्वांना निश्चितच आनंद होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहे. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पुणे विद्यापीठावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी केले होते. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमित ठाकरे हे मनसे कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची दखल कुलगुरू सुरेश गोसावी यांनी घेतली आहे. दरम्यान, आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. जर येत्या आठ दिवसांत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ, असाही अमित ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.