ऑनलाइन लोकमत
बोदवड, दि. 13 - कला आणि कलावंत यांची भूमी असलेल्या जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेलवड येथे अडीचशे वर्षाची मोठी परंपरा व इतिहास असलेल्या बालाजी देवस्थानच्या ब्राह्मोत्सवाला दसऱ्याच्या पालखी उत्सवापासून सुरूवात झाली. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवात ११ रोजी व्यकंटेश पती ‘बालाजी उत्सव मूर्ती’ला पालखीतून गाव प्रदक्षणा घालून सुरूवात करण्यात आली. १२, १३ रोजी भजन, कीर्तन, आरतीचे आयोजन तर १४,१५,१६,१७ या चार दिवसात विष्णूचा मत्स अवतार, रामायन , नृसिंह अवतार नाटीका सादर करण्यात येणार आहे. बालाजी उत्सवाला सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा आहे. मंदिराचे विश्वस्त रमणसिंग पाटील यांची सातवी पिढी या उत्सवाची परंपरा जपत आहे. मोघल काळातील केशरसिंग पाटील, पांडुरंग पाटील, मोहनसिंग पाटील, त्र्यंबकसिंग पाटील व आता रमणसिंग पाटील ही मौर्य घराण्याची सातवी पिढी हा वारसा जपत आहे. बालाजी उत्सवाप्रमाणेच नाटक प्रयोगाची उज्ज्वल दीडशे वर्षाची परंपरा ही संस्था जपत आली आहे. आजच्या डिजिटल युगात ही नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकाची भरभरून दाद मिळत असल्यानेच उत्साह कायम असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रमणसिंग पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाला संपूर्ण शेलवड गाव व संस्थेचे सेवाधारी संचालक कडू गावडे, गणेश कुलकर्णी, गोविंदा कापसे यांचे सहकार्य लाभत आहे. संस्था ही १९५३ साली नोंदणीकृत आहे. स्वत:चे नाट्यगृह असलेले जिल्ह्यातील एकमेव संस्थान आहे. या संस्थेची अडीचशे वर्षा पूर्वीची उत्सव मूर्ती व १५ वर्षा पूर्वीची पाषाण मूर्ती आहे. तालुक्यातील हे एकमेव बालाजी मंदीर आहे.