वसई : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी महामंडळाने वसईतील शहरी वाहतूक सुरुच ठेवली आहे. तर कोर्टाने राज्य सरकारला वसईतील परिवहन सेवेबाबत प्रतित्रापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एसटी आणि महापालिकेत सध्या सुरु असलेल्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.एसटी महामंडळाने १ एप्रिलपासून वसईतील शहरी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर महापालिकेने जोपर्यंत एसटी भाड्याने जादा देत नाही तोपर्यंत एसटी बंद करणार असलेल्या मार्गावर बस सुरु करण्यास नकार दिला होता. एसटी आणि महापालिकेत जागेवरून अद्यापही तोडगा निघालेला नाही. तर ऐन परिक्षेच्या काळातच एसटी बंद होऊन विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याने सातवीतील विद्यार्थी शरीन डाबरे आणि मुख्याधिपिका डॉमणिका डाबरे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीने कोर्टात बाजूच मांडली गेली नाही. परिणामी ३१ मार्चला हायकोर्टाने एसटी सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून एसटीने आपली सेवा सुरुच ठेवली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच हायकोर्टाने एसटी आणि महापालिकेचीही कानउघडणी केली आहे. त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात परिवहन सेवेसंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहे. आता हायकोर्ट आणि राज्य सरकारचा हस्तक्षेप होणार असल्याने ग्रामीण भागातील परिवहन सेवेबद्दल कायमस्वरुपी तोडगा निघणार हे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
वसईतील एसटी सुरू
By admin | Published: April 03, 2017 4:00 AM