कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५१व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सवाला आज, बुधवारी उत्साहात प्रारंभ झाला. दिवसभर महोत्सवाच्या परिसरात विद्यार्थी-विद्यार्र्थिनींनी गर्दी केली होती. विद्यापीठाच्या लोककला केंद्रासमोरील जागेत हा ग्रंथ महोत्सव भरविण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता बॅ. बाळासाहेब खर्डेकर व डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, प्रा. वासंती रासम, सहायक ग्रंथपाल पी. बी. बिलावर, आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर कुलगुरूंसह प्रमुख उपस्थितांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पुस्तक प्रदर्शनाची पाहणी केली. सहभागी प्रकाशकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रंथमहोत्सवात ४० पुस्तक प्रकाशनांनी आपले स्टॉल्स लावले आहेत. त्यामध्ये क्रमिक पुस्तकांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वासाठी उपयुक्त अशी शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शक पुस्तकांसह विविध सामाजिक, साहित्यिक, वैचारिक पुस्तकांच्या स्टॉल्सचा यांत समावेश आहे. काही प्रकाशकांनी सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध केली आहेत. महोत्सवातील ग्रंथ, पुस्तके पाहण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या ठिकाणी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
ग्रंथमहोत्सवाला उत्साहात सुरुवात
By admin | Published: January 29, 2015 12:52 AM