कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला
By समीर देशपांडे | Published: November 24, 2022 12:27 PM2022-11-24T12:27:07+5:302022-11-24T12:27:27+5:30
या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.
समीर देशपांडे -
कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे येथे एका वकिलाने गायरानात केलेल्या अतिक्रमणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापूरमधून वात लागली आणि राज्यातील गायराने पेटली, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
हलसवडे येथील तानाजी अशोक पाटील यांनी गावच्या गायरानामध्ये ॲड. रावसाो बंडू पाटील यांनी अतिक्रमण करून १५०० चौरस फुटाचे दोन मजली घर बांधण्यास सुरुवात केली असून हे बांधकाम थांबवावे, अशी तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ मे २०२२ रोजी केली. याचवेळी त्यांनी जिल्हा आणि उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातही तक्रार दिल्याने ११ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्राने निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करणारे पत्र जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार करवीर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अहवालानुसार काम थांबविले. या जागेच्या मोजणीसाठी ग्रामपंचायतीने ९ हजार रुपये भरलेही आहेत; परंतु अजून मोजणी झाली नाही. त्याचदरम्यान ३० जून २०२२ रोजी उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करतानाच १८ जुलै २२ रोजी सुनावणी ठेवली आणि त्यावेळी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या गायरानातील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढण्याचे आदेश दिले.
हे उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत
या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.