साहित्य संमेलनाला वाढीव अनुदान द्या - जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:49 AM2018-02-12T02:49:20+5:302018-02-12T02:56:19+5:30
महाराष्ट्र राज्य शासनाने बृहन्महाराष्ट्रातील ९१वे बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वाढीव आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, यासंबंधी तातडीने घोषणा करण्याची विनंती करणारे पत्र महामंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाने बृहन्महाराष्ट्रातील ९१वे बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वाढीव आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, यासंबंधी तातडीने घोषणा करण्याची विनंती करणारे पत्र महामंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
गुजरात सरकारनेदेखील महाराष्ट्र सरकारप्रमाणे बडोदा येथे नियोजित ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. महामंडळाने यापूर्वी साहित्य संमेलनाच्या वाढीव निधीबाबत राज्य शासनाला विनंती केली होती. मात्र, तरीही ही मागणी प्रलंबित असल्याची खंत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यासह सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनाही याविषयी पत्र पाठविले असून, अजूनही वेळ गेलेली नसून, महाराष्ट्र सरकारने तातडीने महामंडळाच्या मागणीचा विचार करावा, असे डॉ.जोशी यांनी म्हटले आहे. ती मागणी पूर्ण केल्यास, गुजरात सरकारकडेही तशा वाढीव साहाय्याची मागणी करता येईल, अशी विनंतीही या पत्राद्वारे केली आहे. या अगोदर कर्नाटक शासनाने साहित्य संमेलनासाठी ८ कोटी रुपये दिले आहेत, याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.