मुंबई : तंत्रज्ञानावर आधारित या लढायांना पराभूत करण्यासाठी, सकारात्मक अशा घटकांची मोट बांधण्याची गरज आहे. दहशतवादाला आळा घालण्यास अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणाऱ्या सुरक्षा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारे धोरण आखले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.पोलीस महासंचालनालयाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायसवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी निवृत्त पोलीस अधिकारी आलोक जोशी, इन्स्टिट्यूट आॅफ कॉफ्लिक्ट मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजय सहानी यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील क्रमांक १चे पोलीस दल आहे. मुंबई, पुणे व नागपूरसारख्या दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील असलेल्या शहरांची सुरक्षा सक्षमपणे हाताळली आहे. यापुढे सायबर स्पेस आणि समाज माध्यमांतूनच दहशतवादी कारवायांना उत्तेजन देणाºया तंत्रज्ञानावर आधारित लढाया लढल्या जातील. अलीकडेच मुंबई पोलिसांनी आर्टिफिशीयल इंटलेजीन्सवर आधारित प्रणाली वापरणे सुरू केले आहे.
दहशतवाद रोखण्यासाठी सुरक्षा क्षेत्रातही ‘स्टार्टअप्स’; पोलीस दलाचा ५९ वा स्थापना दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 1:26 AM