सुमेध वाघमारे नागपूर : राज्यात शासकीयसह महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या २५ टक्के जागा वाढविण्याचे प्रस्तावित असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या पूर्वी १० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर’ समितीने २५ टक्के जागा वाढविण्याचा सूचना केल्याने आता यात बदल करण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची असलेली कमतरता दूर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०१३-१४ मध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. याचा फायदा दोनशेच्या आत एमबीबीएसच्या जागा असलेल्या महाविद्यालयांना झाला. मात्र या जागेला अनुसरून अनेक ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ व पायाभूत सोयी देण्यास शासन कमी पडले. परिणामी, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ आजही या वाढीव जागांबाबत त्रुटी काढत आहे.
दरम्यानच्या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यात पुन्हा एमबीबीएसच्या १० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. सुत्रानूसार, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर’ समितीने या निर्णयात बदल केला. १० टक्क्यांवरून २५ टक्के जागा करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) राज्यात १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. महापालिकेसह, वैद्यकीय महाविद्यालयांच्या मिळून एमबीबीएसच्या साधारण ३०८० जागा आहेत. २५ टक्के जागेला मंजुरी मिळाल्यास साधारण ७७० जागा राज्यात वाढण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने पायाभूत सोयी वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.