पुणे - राज्यातील ठाकरे सरकारविरोधात भाजपाने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केलं होतं. पुण्यातही अशाप्रकारे भाजपाने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. पण या आंदोलनाला आणलेली गर्दी पैसे देऊन बोलवल्याचं समोर आलं. यातील बहुतांश लोकांना सरकारचा निषेध कशासाठी करतोय याची माहितीच नसल्याचं आढळून आलं. भाजपाने मात्र या आरोपाचं खंडन केले आहे.
मंगळवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक भाजपानं दिली होती. राज्यभरात हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार आणि मागील शासनाने घेतलेले निर्णय बदलणे यासारख्या अनेक मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. पुणे येथे जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात शहरातील ६ मतदारसंघातून कार्यकर्ते जमा झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री दिलीप कांबळे हे नेते आंदोलनस्थळी उपस्थित होते. या आंदोलनासाठी रस्त्याशेजारी छोटं व्यासपीठ बांधलं होतं, त्याच्यासमोर आंदोलकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. गर्दीमुळे वाहतुकीला फटका बसू नये यासाठी मतदारसंघनिहाय गर्दीचं विभाजन केले होते. सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरु होती.
मात्र आपण नेमका निषेध कसला करतोय? याची माहिती नसल्याने गर्दीतली काही लोकं हतबल असल्याचं पाहायला मिळत होतं. यातील आंदोलक शहरातील विविध भागातून नगरसेवकांनी आणले होते. सिंहगड रोड येथील रहिवासी असलेल्या दीपाली पाटोळे आपल्या मुलांसह आंदोलनाला आल्या होत्या. 'पुणे मिरर' या इंग्रजी दैनिकाने तिच्याशी बातचीत केल्यानंतर तिने सांगितले की, आमच्या भागातील एका महिलेसोबत मी इथं आली आहे. आमचे नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी आम्हाला येथे येण्यासाठी सांगितले. म्हणून आम्ही आमच्या भागातील महिलांसोबत याठिकाणी आलो, यासाठी आम्हाला पैसे मिळतील असं सांगण्यात आलं.
तर कामगार वस्तीमधील राजुरबाई कांबळे म्हणाल्या की, आमच्या भागातील कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं येण्यासाठी सांगितले. यासाठी मला १०० रुपये देतील असं म्हणाले पण मला या उन्हात बसवून फक्त वडापाव दिला आहे. साधं पाणीही दिलं नाही. मला पैसे मिळतील की नाही याचीही खात्री नसल्याचं त्या म्हणाल्या. याच वस्तीतील आणखी एक रहिवासी शोभा सोनवणे म्हणाल्या, आमच्या भागातील नेते अशोक लोखंडे यांच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. मेट्रोच्या कामामुळे आम्हाला घरं सोडण्यास सांगितले आहे. पण आमचं अद्याप पुनर्वसन केले नाही. याच विषयावर चर्चा करतील या विचाराने मी इथं आली. त्याचसोबत या गर्दीत असणाऱ्या राजेंद्र ढवळे यांनी भाजपासाठी काम करतो असा दावा केला. मी रोजंदारीवर काम करतो, याठिकाणी आल्यानंतर पैसे देऊ असं सांगण्यात आलं. माझ्यासोबत ५० ते ६० माणसं आली आहेत. आम्हाला निषेधाची माहिती नाही, आमच्या हातात बॅनर्स देण्यात आले. काहीतरी पैसे मिळतील यामुळे काम बुडवून याठिकाणी आलो असं त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकाराचं भाजपाने खंडण केले आहे. याबाबत जगताप यांनी सांगितले की, मी माझ्या मतदारसंघातील १०० ते १५० कार्यकर्त्यांना निषेध करण्यासाठी यायला सांगितले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना पैसे देण्याचा प्रश्नच नाही. माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप त्यांनी लावला आहे.