मुंबई - भाजपाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपाचे मित्र पक्ष नाराज झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, याबाबत मंगळवारी एकत्र येऊन भाजपाचे मित्रपक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही भाजपाने घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षांतर करुन भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांचीही गोची झाली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचं वाढत वर्चस्व आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशानंतर विरोधीपक्षातील काठावर असलेल्या नेत्यांना भाजपची भुरळ पडली. भाजपने देखील काठावर असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठी मेगाभरती घेतली होती. मात्र राज्यातील बदललेली राजकीय स्थिती पाहता विकासाचा मुद्दा सांगून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. तसेच, भाजपाचीच सत्ता येणार, पु्न्हा महायुतीचंच सरकार येणार या आशेनं भाजपाच्या मित्रपक्षांनीही भाजपासोबतच राहणे पसंत केले. मात्र, शिवसेना-भाजपाच्या वादामुळे मित्रपक्षांची अवस्था इकडं आड, तिकडं विहीर अशीच झाली आहे.
भाजपाचा मित्रपक्ष म्हणून केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचा रिपाइं, महादेव जानकर यांचा रासप, विनायक मेटेंचा शिवसंग्राम, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती आणि इतरही पक्ष व संघटना भाजपासोबत राहिले. मात्र, भाजपाच्या विरोधातील भूमिकेमुळे या नेत्यांची गोची झाली आहे. आता, काय कराव हा पेचप्रसंग त्यांच्यासमोर उभारला आहे. कारण, या चारही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची पदे धोक्यात आली आहेत.