मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून ९ जुलैला विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राजभवनात साध्या समारंभात नवीन मंत्र्यांना शपथ दिली जाईल. विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती निवडण्यासाठी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन ८ जुलै रोजी होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ला विस्तार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० ते १४ जुलै दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आजचा विस्तार लक्षात घेता बऱ्याच उच्च विद्याविभूषित व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे. या शिवाय, विविध जातींना सामावून घेताना दलित चेहऱ्यांना अधिक संधी देण्यात आली. महिला आणि मुस्लिमांनाही स्थान मिळाले आहे. सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग करण्यात आला आहे. याच धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस विस्तार करतील का या बाबत उत्सुकता आहे. तथापि, केंद्राइतकी विस्ताराची संधी राज्याला नाही. त्यामुळे केंद्रासारखे प्रयोग करण्याचीही संधी फारशी नसेल. शिवाय, असे प्रयोग करण्यापेक्षा सामाजिक, प्रादेशिक संतुलन साधणे हा मुख्य निकष असेल असे मानले जाते. महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) आणि सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना) या दोघांना निश्चितपणे स्थान मिळेल. शिवसेनेचे दोन जण मंत्री होतील. भाजपाचे पाच नवे मंत्री होतील. तीन मंत्रिपदे रिक्त ठेवली जातील, असे मानले जाते. (विशेष प्रतिनिधी)शिवसेनेला हवीत आणखी मंत्रिपदे- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सूर नरमला असून राज्यात तरी मंत्रीपदे वाढवून द्यावीत आणि खातीही बदलून द्यावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन दिवाकर रावते आदी शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा बंगल्यावर चर्चा केली. आधी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला विस्तारात दोन राज्यमंत्रीपदे मिळू शकतात. मात्र, एक कॅबिनेट मंत्रीपद वाढवून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार ९ जुलै रोजी
By admin | Published: July 06, 2016 2:01 AM