छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यातील दोन जिल्हे वगळता सहा जिल्ह्यात दुष्काळ आहे. धरणे जोत्याखाली गेलेली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा ६८५ वर गेला आहे, अशा परिस्थितीत मराठवाडा असताना मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव सांगता आणि मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी होत आहे. यासाठी शहरात मुंबईतून येणाऱ्या मंत्री आणि सरकारी यंत्रणेसाठी खास शाही भाेजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ सप्टेंबरच्या दोन वेळच्या जेवणासाठी १,५०० रुपये प्लेट याप्रमाणे सुमारे ३० लाख रुपयांचे जेवण सचिव व इतर अधिकारी यांच्यासाठी असेल, तर मंत्र्यांना हॉटेलमधून जेवण जाणार आहे. काही मंत्री शुक्रवारीच शहरात दाखल झाले. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकाळी शहरात येतील. अमृत महोत्सवाच्या आडून हा खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विभागीय आयुक्त बाजूलाच...मंत्रिमंडळ बैठकीच्या नियोजनातून विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना बाजुला ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. विभागातून किती प्रस्ताव गेले, याची माहिती आयुक्तालयापर्यंत आली नाही. बैठकीचे ठिकाण बदलल्यामुळे आयुक्तालयाचे ग्लॅमरच गेल्यासारखे झाले. जिल्हाधिकारी, पालिका प्रशासक, जि. प. सीईओंनी पूर्ण नियोजनात बाजी मारली. प्रमोटी आयएएस आणि थेट आयएएस असा प्रशासनातील भेदही यानिमित्ताने दिसून आला.
राजा तुपाशी, शेतकरी उपाशीआतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची परंपरा ट्रिपल इंजिन सरकारने मोडीत काढली आहे. मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुक्काम ३२ हजार रुपये भाडे असलेल्या आलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी अशी स्थिती आहे. - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
‘इंडिया’चे घटक पक्ष ‘सह्याद्री’वर राहिले होते का?इंडियाच्या बैठकीत घटक पक्ष काँग्रेसचे नेते ‘सह्याद्री’वर राहिले होते का? सरकारी विमानाने घटक बैठकीत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल कसे आले आणि कुठे राहिले? एवढेच काय तर त्या काळी सिगारेटसाठी पंडित नेहरू विमान पाठवायचे याचा हिशेब कोण मागणार? - सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री
मुख्यमंत्र्यांना पत्रकार म्हणून विचारणार प्रश्नखासदार असलो तरी पत्रकार म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेला जाणार आहे. राज्यातील राजकीय स्थितीबाबतचा निकाल चाळीस दिवसांत लागणे अपेक्षित होते, त्यावर अद्याप काहीही झाले नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमात पैसे उधळले जात आहेत, याचा हिशेब सरकारला द्यावा लागेल.- खा. संजय राऊतनेते, शिवसेना (ठाकरे गट)
दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर हे तर मीठसर्वसामान्य जनता दुष्काळ आणि महागाईत होरपळत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस