पुणे: राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून गृहनिर्माण सोसायट्या व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दिलेली मुदतवाढ १५ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्याआधीच हे आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात दीड लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था आहे. त्यांच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर आहे. निवडणूक जाहीर करण्यापासून ते पार पडेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असते. सन २०१९ मध्ये मुदत संपलेल्या १३ हजार ४३ संस्था होत्या. त्यांची निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने सुरू केलीच होती. मात्र मार्चपासून कोरोना प्रादुर्भावास सुरूवात झाली व त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर जानेवारी.२०२० पासून मागील ६ महिन्यात ३१ हजार ३९४ संस्थांची मुदत संपली आहे. त्यांनाही कोरोनामुळेच मुदतवाढ मिळाली. ही मूदत १५ सप्टेंबर ला पूर्ण होत आहे. कोरोना प्रादुर्भाव दरम्यानच्या काळात कमी होण्याऐवजी वाढलाच आहे. त्यामुळे आता प्राधिकरणाकडून पुन्हा मुदतवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. किमान २ महिने मुदतवाढ दिली जाईल असे दिसते आहे.सहकार प्राधिकरणाचे सचिव यशनंत गिरी यांनी याला दुजोरा दिला. राज्यातील क्रुषी ऊत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकाही याच कारणामुळे पुढे ढकलण्यात येणार आहेत. सन २०१९ मध्ये ५२ व या वर्षातील अशा एकूण १८० समित्यांची मुदत संपली असून त्यांची निवडणूक प्रलंबित आहे.
---//
सभासद संख्या २५० पेक्षा कमी असेल तर अशा संस्था स्वतःच त्यांची निवडणूक घेऊ शकतात. मात्र या संस्थांसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येत आहे. त्याला आता वर्ष होऊन गेले, मात्र नियमावली झाली नाही. त्यामुळे या संस्थांच्याही निवडणुका प्रलंबित आहेत.