अकोला : महाराष्ट्र राज्यातील तब्बल ३०० स्वतंत्र व्यवसायी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या पत्रिकेची नूतनीकरणाची प्रक्रिया राज्य समितीने थांबविली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या राज्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, यासंदर्भात सोलापूर येथे २८ मे रोजी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यातील सर्व जिल्हा व तालुकस्तरावरील पत्रकारांच्यापत्रिका नूतनीकरणाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.एका वर्तमानपत्राने फक्त एकाच स्वतंत्र व्यवसायी पत्रकाराला शिफारसपत्र द्यावे, हा नियम समोर करीत, राज्यातील ३०० पत्रकारांच्या अधिस्वीकृती पत्रिका रद्द करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत समोर आला. त्यामुळे समितीने वार्षिक नूतनीकरणासाठी आलेल्या सर्व पत्रिका थांबवून ठेवून, पुढच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्याचे ठरविले आहे. दरम्यान ज्या पत्रकारांच्या पत्रिका थांबविल्या गेल्या आहेत, त्यांची माहिती जिल्हा निहाय माहिती अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. राज्य समितीच्या या निर्णयामुळे राज्यभरातील तीनशे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांमध्ये खळबळ माजली आहे. याबाबत अंतिम निर्णय २८ मे च्या बैठकीत समिती घेणार असल्याचे राज्याचे माहिती व जनसंपर्काचे महासंचालक देवेंद्र भुजबळ यांनी सांगितले.