"१५ लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदेश काँग्रेसतर्फे अभिनंदन"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 08:09 PM2020-07-29T20:09:29+5:302020-07-29T20:09:42+5:30
केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला १५ लाख कोरोनाचे रुग्ण दिले व भारताला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान दिले.
मुंबई -सहा वर्षांपूर्वी सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. परंतु त्यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून १५ लाख देऊ हे आश्वासन मात्र आता पूर्ण केले आहे. केवळ काळ्या पैशाऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला १५ लाख कोरोनाचे रुग्ण दिले व भारताला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान दिले. त्याबद्दल प्रदेश काँग्रेसतर्फे आम्ही मोदीजींचे हार्दिक अभिनंदन करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपाचे नेते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला कोरोनाच्या संदर्भात तुम्ही काय केले? हा प्रश्न विचारत आहेत. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणे आमची बौद्धिक क्षमता नसल्याने आम्ही आमच्या अल्पबुद्धीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य वैद्यकीय उपचार, नवीन रुग्णालयांची उभारणी, चाचण्यांची संख्या वाढवून चेस द वायरस सारखी प्रभावी कार्यपद्धती अंमलात आणली. ज्याची प्रशंसा आयसीएमआरने केली असून देशात हेच मॉडेल राबवले पाहिजे असे म्हटले आहे.
धारावीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची जगभरातून तारीफ केली गेली आहे. परंतु भाजप नेत्यांच्या ते पचनी पडले नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही मोदीजींच्या अभिनव व अनोख्या उपचारपद्धती प्रमाणे थाळ्या वाजवल्या, दिवे लावले पाहिजे होते, किंवा जनतेला भाभीजींचे पापड वाटले असते तर कोरोना नेस्तनाबूत झाला असता. अशा अनोख्या योजनांमुळे आणि मोदीजींच्या कर्तबगारीमुळे कोरोना परदेशातून भारतात आलाच नाही तर आज कोरोना रूग्णसंख्येत भारत जगात तिस-या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करत आहे. यातून भारताची किर्ती पूर्ण विश्वात पसरली आहे. हे केवळ मोदींनी योग्य निर्णय योग्य वेळेला घेतले यामुळेच शक्य झाले आहे. असे स्वत: मोदीच म्हणाले आहेत. यामागे निश्चितच मोदींच्या दूरदृष्टीचा आणि अभिनव कार्यपद्धतीचा हात आहे, असा टोला लगावत मोदी कोरोना विरोधातले युद्ध २१ दिवसांत जिंकणार होते परंतु प्रत्यक्षात कोरोनाच्या साथीने भारतीयांविरोधात युद्ध करत आहेत, असे सावंत म्हणाले.