नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी साहित्यक्षेत्रालादेखील नवी दिशा दिली. बाबासाहेबांची विचारसंपदा मौलिक आहे. त्यांच्या विचारांचा आणखी प्रचार-प्रसार व्हावा यासाठी राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्ताने विदर्भातील सर्व विद्यापीठांतर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजप्रबोधन विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार एका विशिष्ट जातीधर्मापुरता मर्यादित नव्हता. त्यांचे विचार हे सर्वांसाठी होते. परंतु काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा बाजार करत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे, असे बडोले म्हणाले. या कार्यक्रमात विदर्भातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>विदर्भ-महाराष्ट्रवाद्यांची घोषणाबाजीया परिषदेला राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणेदेखील उपस्थित होते. त्यांचे मार्गदर्शन सुरू होण्याअगोदर सभागृहातील काही विद्यार्थ्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूने घोषणा सुरू केल्या. तर, काही विद्यार्थ्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अॅड. अणे यांनीच ही विदर्भ नव्हे, तर सामाजिक प्रबोधनाची परिषद असल्याचे म्हणत सर्वांना शांत केले.
राज्यात डॉ. आंबेडकर साहित्य अकादमी स्थापणार
By admin | Published: August 22, 2016 5:28 AM