ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 08 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे आणि डोंबिवली येथील पथकांनी शुक्रवारी केलेल्या एका धडक कारवाईत ढाब्यांवर पुन्हा विदेशी आणि गावठी मद्य आढळले. यात आठ जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे युनिट एकच्या पथकाने कल्याणच्या चिकणघर येथील महादेव मंदिराजवळील ‘एमएच शून्य पाच’ या ढाब्यावर ७ जुलै रोजी कारवाई केली. दुसरी कारवाई कल्याणच्याच खडकपाडा येथील ‘साई महादेव’ ढाब्यावर झाली. तिसरा छापा दहीसर मोरी नाका येथील ‘सुखदेव ढाबा’ येथे टाकण्यात आला. चौथी कारवाई दहीसर गावातील ‘पार्क चायनीज कॉर्नर’ याठिकाणी झाली. या चारही ठिकाणच्या कारवाईत ३.५ बल्क लीटर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, २३.६० बल्क लीटर बियर आणि ५.०४ बल्क लीटर देशी दारु असा सात हजार ९९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले, ठाण्याच्या डायघर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण पाच गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.डोंबिवली विभागानेही ७ जुलै रोजी ‘आई एकविरा ढाबा’ आणि ‘नानाचा ढाबा’ या दोन ठिकाणी धाड टाकून १३.३५ बल्क लीटर बियर, २.३४ बल्क लीटर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि २० बल्क लीटर ताडी असा पाच हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी दारुच्या अड्डयावरही कारवाईठाणे युनिट दोनच्या पथकाने भिवंडी तालुक्यातील ठाकराचा पाडा येथे एका गावठी दारुच्या अड्डयावर धाड टाकून गावठी दारु निर्मितीचे दोन हजार ७०० लीटर रसायन, एक बॉयलर आणि इतर सामुग्री असा ६३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात बेवारस गावठी दारुच्या अड्डयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्हयात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई सुरुच
By admin | Published: July 08, 2017 10:35 PM