ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - शिष्यवृत्ती तसेच महाविद्यालयांच्या दर्जासंदर्भात सकारात्मक पावले उचलली नाही, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपराजधानीत पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्यात भाजपा आघाडीची सत्ता असूनदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभाविपने काढलेला मोर्चा हा शासनाला घरचा अहेरच मानण्यात येत आहे. अभाविपच्या विदर्भ प्रांतातर्फे विविध प्रकारच्या ५२ मागण्यांसंदर्भात धडक मोर्चा काढण्यात आला. यात पूनर्मूल्यांकन तसेच निकालांना होणारा उशीर, महाविद्यालयांची मनमानी, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अतिरिक्त शुल्क इत्यादींसंदर्भात त्यांच्या मागण्या होत्या. सिताबर्डी येथील अभाविप कार्यालयाजवळून दुपारी १२ च्या सुमारास हा मोर्चा निघाला. सुरुवातीला मोर्चात एक ते दीड हजार कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी होते. परंतु नागपूर विद्यापीठाजवळ मोर्चा येईपर्यंत ही संख्या ४ हजारांच्या जवळपास झाली होती. नागपुरासोबतच आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनदेखील कार्यकर्ते पोहोचले होते. कार्यकर्ते शासन व विद्यापीठविरोधी घोषणा देत होते. या आंदोलनामुळे नागपूर विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अभाविपच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. ५२ पैकी ४५ मागण्या मान्य करण्यात येतील, असे लेखी आश्वासन कुलगुरूंनी यावेळी दिले.