मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात चुकीचे मेसेज फिरत आहेत. विशेषत: व्हाट्सअॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, पोस्ट्स पाठविल्या जात आहेत. कोरोनाला धार्मिक रंग देत समाजात अशांतता पसरेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
या पार्श्वभीमीवर व्हाटस्अपवरील सर्व ग्रुप, त्यांचे निर्माते, अॅडमिन आणि सदस्यांसाठी आचारसंहिताच महाराष्ट्र सायबरने केली असून त्याचे पालन करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे सांगतानाच गृहमंत्री देशमुख म्हणाले की समाजमाध्यमाद्वारे कोरोना संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरविणाºया बातम्या समाजात पसरायला नकोत. कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता सरकारने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे त्याचे सर्वांनी पालन करावे, असे देशमुख म्हणाले.आपल्या ग्रुपमध्ये इतरांनी अशी पोस्ट केली असेल तर ती फॉरवर्ड करू नका, असे आवाहन ग्रुपच्या सदस्यांना करण्यात आले आहे. तर, अॅडमिनने खात्री करूनच एखाद्याला ग्रुपमध्ये घ्यावे, ग्रुपचा उद्देश, नियमावली सदस्यांना सांगावी. कोणी ग्रुपवर काही आक्षेपार्ह पोस्ट्स,मेसेजेस, व्हिडिओ , मीम्स किंवा तत्सम बाबी शेअर केल्यास, त्याला तात्काळ त्या ग्रुपमधून काढून टाकावे. गरज भासल्यास ग्रुप सेटिंग बदलून तो अॅडमिन ओन्ली करावा. सुचना देऊनसुद्धा आक्षेपार्ह पोस्ट्स टाकले जात असतील तर नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आक्षेपार्ह पोस्ट्स टाकणारे सदस्य आणि अॅडमिनला विविध कलमांखाली तीन वर्षापर्यंतचा कारावास, द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर, भारताच्या सार्वभौमत्वाला व स्वायत्तत्तेला धोका निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारी विधाने असतील तर यासंदर्भातील कलमानुसार आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे. तसेच अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘आक्षेपार्ह मोबाइलमध्ये ठेवू नका’धर्म, समुदायाविरुद्ध हिंसक, अश्लील, भडकावू व तेढ निर्माण होईल असे साहित्य, पोस्ट्स, व्हिडीओ, मीम्स कोणत्याही ग्रुपवर किंवा वैयक्तिकपणेसुद्धा शेअर करू नये, मोबाइलमध्ये पण स्टोअर करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे़