पुणे: राज्य शासनातर्फे दिल्या जाणा-या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.त्यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत वितरित केल्या जाणा-या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवरून आॅनलाईन अर्ज भरावेत,असे आवाहन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली असून अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची असेल,असे माने यांनी स्पष्ट केले.राज्य शासनावतीने मागील वर्षीच महाडीबीटी पोर्टलद्वारे सर्व शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार होते.मात्र,पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरता आला नाही.परिणामी डीबीटी पोर्टल ऐवजी महाईस्कॉलद्वारे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.मात्र, महाईस्कॉल बरोबर असलेला करार संपुष्टात आलेला असल्यामुळे मागील वर्षी बहुतांश विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज आॅफलाईन पध्दतीने स्वीकारले. मात्र,यंदा पुन्हा http://ZÔhÔdbtZÔhÔit.gov.i हे संकेतस्थळ माहिती व तंत्रज्ञान संचालनालयातर्फे नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलचा वापर करावा लागणार आहे.सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी डीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबतची माहिती संस्थेच्या दर्शनी भागात सूचना फलकावर कायमस्वरूपी लावावी.तसेच शिष्यवृत्तीस पात्र असणा-या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे.तसेच शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा केल्याबाबतची सूचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाणार आहे.त्यामुळे संबंधित विद्यापीठ,शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालयाने कोणत्याही विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी अतिरिक्त शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये.तसेच विद्याथ्यार्ची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता घावी,असेही माने यांनी सांगितले.---------अर्जदाराची शिष्यवृत्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द अर्जदार शिष्यवृत्तीसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटी लागू करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी पात्र आहे,याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची असेल.तसेच अर्जदाराची पात्रता कोणत्याही पातळीवर अवैध आढळली तर त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत केवळ आॅनलाईनच असेल.------------------------------------------विद्यार्थ्यांनी बँक खाते आधार लिंक करावे डीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता,शिक्षण फी इतर अनुज्ञेय फी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर थेट वितरीत केली जाणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे,असे आवाहन डॉ.धनराज माने यांनी लोकमतशी बोलताना केले ....................शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्तीची यादी १) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना २) डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ३) राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती ४) गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ५) शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती ६) एकलव्य आर्थिक सहाय्य ७) गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य (कनिष्ठ स्तर)८) गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य (वरिष्ठ स्तर)९)राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती १०) शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती११) जवाहरलाल नहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती१२) माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य१३) स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य १४) राज्य शासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना महाईस्कॉल
राज्य सरकारचे डीबीटी महापोर्टल पुन्हा सुरु : शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 7:53 PM
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत वितरित केल्या जाणा-या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवरून आॅनलाईन अर्ज भरावेत
ठळक मुद्दे उच्च शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलचा वापर करावा लागणारअर्जदाराची पात्रता कोणत्याही पातळीवर अवैध आढळली तर त्याची शिष्यवृत्ती रद्द अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची